Wednesday, 15 May 2013

गरज आहे दुसऱ्या गणराज्याची_-शरद जोशी


संपादकीय
शरद जोशी
Published: Wednesday, May 15, 2013
भारतीय संसद लोकांचे प्रतिनिधित्व करतच नाही. आपला देश अनेक समाजांचा, अनेक समुदायांचा बनलेला आहे. त्या सर्वाचे प्रतिनिधित्व करणारी संसद निवडून यावी अशी इच्छा असेल तर जर्मनीतील 'प्रमाणशीर प्रतिनिधित्व' सारखी पद्धत अवलंबणे आवश्यक आहे..
१८ एप्रिल १९५२ रोजी भारतातील घटना समितीने स्वत:लाच देशाची पहिली संसद म्हणून गठित केले. या संसदेची पहिली बठक १३ मे १९५२ रोजी झाली. या घटनेस नुकतीच ६१ वष्रे पूर्ण झाली. इतिहासात मागे वळून पाहता, भारतीय संसद ही राजीव गांधींच्या काळापर्यंत तरी काही शिष्टाचार आणि सदाचार सांभाळून होती, राजीव गांधींच्या पक्षांतरबंदी कायद्यानंतर तिचे अध:पतन सुरू झाले. या धोक्यासंबंधी पूर्वसूचना अनेक जाणकारांनी दिलेली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि घाईघाईने पक्षांतरबंदीसंबंधीचा कायदा घटनादुरुस्तीच्या रूपात संमत करण्यात आला.
   या कायद्याचे थोडक्यात स्वरूप असे : पक्षामध्ये एकतृतीयांशपेक्षा जास्त सदस्य पक्षाच्या धोरणाच्या बाजूचे नसतील तरच ते मुख्य पक्षातून फुटून वेगळा पक्ष स्थापन करू शकतात, अन्यथा त्यांना आपल्या पदाला मुकावे लागते. या तरतुदीचा परिणाम असा झाला, की निवडणुकीच्या वेळी दिलेला जाहीरनामा, त्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने यांचा काहीही संबंध ठेवता प्रचलित पक्षाचे नेते जे ठरवतील तीच पक्षाची भूमिका असे मानले जाऊ लागले. परिणामत: संसद हे चच्रेचे निर्णयाचे केंद्र राहता प्रत्यक्ष निर्णय हे संसदगृहाच्या बाहेर कोठेतरी होऊ लागले. हे स्थळ वारंवार बदलत गेले. सध्या हे स्थान '१०, जनपथ' येथे आहे.
राज्यसभेचा एकेकाळचा खासदार म्हणून माझा अनुभव असा आहे, की चालू असलेल्या चच्रेत खासदारांना रस नसतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांनाही संसदेत नेमके काय चाललेले आहे याचा काही ठावठिकाणा नसतो. एकेकाळी, असे ऐकतो की, बॅरिस्टर नाथ लोकसभेत बोलणार असले तर स्वत: पंतप्रधान नेहरू संसद भवनात येऊन बसत असत. ही परंपरा आता मोडीत निघाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार बोलतात आणि अनेक वेळा प्रभावीपणे संयुक्त पुरोगामी आघाडीतील भ्रष्टाचार गुन्हेगारी प्रकाशात आणतात. त्याला उत्तर देताना संपुआचे प्रवक्तेही रालोआच्या कारकीर्दीतही याच प्रकारच्या घटना झाल्या असल्याचे सप्रमाण दाखवून देतात. संसदेतील सध्याच्या चर्चा या प्रामुख्याने 'तुझे तोंड अधिक काळे की माझे?' अशा स्वरूपाच्या होतात हे खरेच दुर्दैव आहे. देशात प्रत्यही भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे उजेडात येत आहेत, त्यात मोठेमोठे मान्यवर धुरीण गुंतले असल्याचेही स्पष्ट होत आहे. स्त्रियांवरील अत्याचार जवळजवळ तासागणिक होत आहेत आणि याही परिस्थितीत देशामधील फुटीरवाद बोकाळत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या वेळीही अन्नसुरक्षा विधेयकासारखे विधेयक चच्रेलासुद्धा येऊ शकत नाही इतका गोंधळ संसद सभागृहात माजलेला असतो.  प्रसिद्धीमाध्यमांच्या सध्याच्या स्वरूपामुळे एखादे 'नाथ पै' जरी आपल्या लोकसभेत भाषणाकरिता उभे राहिले तरी ती प्रसिद्धीमाध्यमे त्यांच्याकडे लक्ष देणार नाहीत. संसदेत निर्णायक चर्चा होतच नाही असे म्हटल्यानंतर मग जनतेचे किंवा आपापल्या मतदारसंघाचे तरी लक्ष वेधून घेण्याकरिता खासदार पर्यायी युक्त्याप्रयुक्त्या वापरू लागतात. आपली जागा सोडून अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत जमणे, आरडाओरडा करणे या सर्व युक्त्या खासदार अशाकरिता वापरतात की संसद स्थगित झाली तर त्याची बातमी होते, संसदेने शांतपणे काम केले, चर्चा केल्या, निर्णय घेतले तर त्याची बातमी होत नाही.
 देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळून पडली आहे. शेजारी देश भारतीय नागरिकांना अघोरीपणे वागवीत आहेत आणि दुसरे काही शेजारी देश भारताच्या सार्वभौमत्वाच्या हद्दीकडे सरळसरळ दुर्लक्ष करून हद्दीचे अतिक्रमण करीत आहेत, एवढेच नव्हे तर भारताच्या अरुणाचल, नागालँड इत्यादी अविभाज्य प्रदेशांबद्दल त्यांचे सार्वभौमत्व सांगत आहेत. या परिस्थितीत भारतीय गणराज्याची प्रमुख संस्था ही अशा तऱ्हेने निष्क्रिय बनली आहे हे देशाच्या दृष्टीने मोठे घातक चिन्ह आहे.
लोकसभेमध्ये खासदार पाठवण्याकरिता निवडणुका होतात, त्यात कोणाला उभे केले जाते? त्या उमेदवारांत लाचखोर, गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असे खासदार जवळजवळ बहुसंख्येने कसे निवडून येतात? आवश्यक पडेल तर आवाज चढवून आरडाओरडा करणे आणि प्रसंगी टेबलखुच्र्याही उचलून फेकणे या बाबतीतही उमेदवारांची पात्रता पक्षश्रेष्ठी तपासत असावेत. याबरोबर आता 'निवडून येण्याची क्षमता' असा एक नवा शब्दप्रयोग वारंवार कानी पडतो. 'निवडून येण्याची क्षमता' याचा थोडक्यात अर्थ उमेदवार योग्य जातीचा असावा, योग्य पोटजातीचा असावा, त्याने कोणत्याही मार्गाने का होई ना, भरपूर पसा कमावलेला असावा, आवश्यक तर काही गुंड वापरून मतदारसंघात स्वत:विषयी धाक तयार केलेला असावा असा आहे.
या जागी आणखी एका मुद्दय़ाचा विचार करावयास पाहिजे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात 'आम आदमी'चा फार बोलबाला आहे. त्याबरोबरच वेगवेगळय़ा समाजांतील धर्मातील लोकांना बंधुभावाने वागवावे असा 'भाई-भाई' वादाचाही सर्वमान्य शिष्टाचार आहे. या 'भाई-भाई'वादाचा आणि महात्मा गांधींच्या आध्यात्मिक बंधुत्वाच्या संदेशाचा दुरान्वयानेही संबंध नाही. संपुआचा 'भाई-भाइ'वाद हा निवडणूक जिंकून सत्तेवर टिकून राहण्याचा राजमार्ग आहे. याबद्दल मूळ पाप पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच पदरात घातले पाहिजे. माणूस अतिशय संवेदनशील. त्यामुळे कोठेही गेले की तेथील वातावरणाचा त्यांच्यावर त्वरित प्रभाव पडे. इंग्लंडमध्ये गेले, फेबियन सोश्ॉलिस्ट होऊन आले; रशियात गेले, स्टॅलिनचा प्रभाव घेऊन आले. इंग्लंडला असताना त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचे कामकाज पाहिले होते आणि त्याची चक्क कॉपी करून त्यांनी भारतातील निवडणुकीची व्यवस्था उभी केली. इंग्लंडप्रमाणे मतदारसंघ तयार झाले आणि प्रत्येक मतदारसंघात सर्वात जास्त मते मिळवणारा (ा्र१२३-स्र्ं२३-३ँी-स्र्२३) निवडणुकीत विजयी ठरतो हाही नियम भारतात लागू झाला. त्या वेळच्या कागदोपत्री, सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्लंडमधील, घोडय़ांच्या रेसमध्ये असतो तसा, ो्र१२३-स्र्ं२३-३ँी-स्र्२३ हा नियम आपल्याकडे लावला तर काय होईल याचे विदारक चित्र दिले होते. या पद्धतीमुळे बहुसंख्याकांपेक्षा कळप करून राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजांचे महत्त्व वाढेल आणि प्रत्यक्षात देशामध्ये बहुमत नसलेले पक्ष संसदेमध्ये मताधिक्य मिळवून येतील ही भीती स्वत: वल्लभभाई पटेल यांनी व्यक्त केली होती. फाळणीनंतरच्या अस्थिर स्थितीत देशाला स्थिर सरकार आवश्यक आहे असे स्वत:ला समजावून वल्लभभाई पटेलांनी आपल्या मनातील शंका बाजूला ठेवली. संपुआचा 'भाई-भाई'वाद हा उच्च तात्त्विक भूमिकेवर आधारलेला नसून हे शुद्ध निवडणुकीच्या राजकारणाचे हत्यार आहे.
मुळामध्ये भारतीय संसद लोकांचे प्रतिनिधित्व करतच नाही. भारत देश अनेक समाजांचा, अनेक समुदायांचा आणि अनेक मतामतांचा बनलेला आहे. त्या सर्वाचे प्रतिनिधित्व करणारी संसद निवडून यावी अशी इच्छा असेल तर त्याकरिता फ्रान्स किंवा जर्मनी या देशांत ज्या वेगवेगळय़ा पद्धतींनी निवडणुका होतात त्यांचा अभ्यास करून जर्मनीतील  'प्रमाणशीर प्रतिनिधित्व'(ढ१स्र्१३्रल्लं' फीस्र्१ी२ील्ल३ं३्रल्ल) सारखी पद्धत अवलंबणे आवश्यक आहे.
भारतीय संसदेच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त बोलायचे झाले तर संसद ही आज चच्रेचे, वादविवादाचे स्थान राहिलेले नाही, गुंडगिरी आरडाओरडीचे ठिकाण झाले आहे. संसद लोकमताची प्रातिनिधिक नाही, ती काही छोटय़ा छोटय़ा जातीजमातींच्या मुखंडांची आणि फुटीरवादी नेत्यांच्या भडकावू भाषणांची गुलाम बनली आहे. स्वातंत्र्याच्या वेळच्या पंडित नेहरूंच्या प्रख्यात भाषणात त्यांनी देशातील गरिबी अज्ञान यांचा अंधकार दूर करण्याची आशा दाखवली होती. त्यानंतर 'गरिबी हटाव' हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. 'गरिबी हटाव'च्या नावाखाली आतापर्यंत केवळ सरकारी योजनांतच किती लाख कोटी रुपये खर्च झाले आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा किती लोकांना मिळाला याचाही एक अभ्यास करणे आवश्यक आहे.  प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेले कष्ट, केलेली गुंतवणूक, दाखवलेली उद्योजकता, पत्करलेला धोका यांच्या प्रमाणात मेहनताना मिळाला पाहिजे. या तत्त्वाला पंडित नेहरूंच्या 'लायसन्स-परमिट-कोटा-इन्स्पेक्टर' राज्याच्या काळातच फास बसला. यातूनच 'इंडिया' आणि 'भारत' ही परस्परविरोधी एकके तयार झाली.
काहीही करून सत्ता मिळवायची ही गरज सोनिया गांधींची आहे, राहुल गांधींचीही आहे. त्याकरिता बेगडी 'भाई-भाई'वाद ही त्यांची राजकीय गरज आहे आणि मते विकत घेण्याकरिता सरेआम लोककल्याणाच्या योजना राबविणे हीही त्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत निवडून आलेली संसद काय काम करणार? मी काही भाकीत वर्तवणाऱ्याचा आव आणू इच्छित नाही, पण केवळ संसदच नव्हेतर पहिल्या गणराज्याचे सर्व प्रमुख आधारस्तंभ खिळखिळे झाले आहेत एक नवे 'दुसरे गणराज्य' तयार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मी १५ मे १९८७ रोजीच जेआरडी टाटा मिनू मसानी यांच्या उपस्थितीत जाहीरपणे केले होते.
* लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.


Wednesday, 1 May 2013

स्थानिक संस्था कर हवाच कशाला?


राखेखालचे निखारे

 

संपादकीय
शरद जोशी
Published: Wednesday, May 1, 2013
यथावकाश स्थानिक संस्था कर, तुटक्याफुटक्या अवस्थेत का होईना, अमलात येईल. त्यामुळे नगरपालिकांच्या उत्पन्नाचे काही हुकमी साधनही उपलब्ध होईल. मुख्य प्रश्न वेगळाच आहे. या नगरपालिकांची पर्यायी उत्पन्न घेण्याची पात्रता आहे काय, असा खरा प्रश्न आहे.
आपल्या देशात गावागावात, शहराशहरात आणि गल्लीगल्लीत उभ्या असलेल्या कोपऱ्यावरच्या किराणा मालाच्या दुकानांच्या चिरंजीवित्वाचे रहस्य काय आहे?अनेक झकपक डिपार्टमेंटल स्टोअर्स येऊन गेली. आता परदेशी गुंतवणुकीच्या साहाय्याने सुपर मार्केट्सही येऊ घातली आहेत. तरीही या किराणा मालाच्या दुकानांना धक्का पोहोचलेला नाही.
'
महापुरे झाडें जातीं, तेथे लव्हाळीं वांचतीं' ही तुकाराम महाराजांची उक्ती किराणा दुकानांनी तरी खरी करून दाखवली आहे, पण त्यांच्या चिरंजीवित्वाचे रहस्य त्यांच्या 'लहान'पणात नाही; ते अन्यत्र कोठे तरी आहे. गिऱ्हाईकाच्या रुचीप्रमाणे दुकानदार माल देऊ करतो यात ग्राहकाचा अहंकार सुखावतो. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या पानपट्टीवाल्यावरील लेखात पानपट्टीवालासुद्धा गिऱ्हाईक कायम ठेवण्याकरिता त्याच्या आवडी लक्षात ठेवून आपणहोऊनच त्याची आवड बोलून दाखवतो. याखेरीज, ही छोटी दुकाने ग्राहकाला अनेक वेळा उधारीही देऊ करतात. ही किराणा दुकानांच्या चिरंजीवित्वाची प्राथमिक कारणे.  किराणा मालाच्या दुकानांनी आतापर्यंत मोठय़ा दुकानांशी लढत घेतली. आता त्यांची लढत सरळ सरळ सरकारने जाहीर केलेल्या 'स्थानिक संस्था कर' (छूं' इ८ि ळं७ -छइळ) याविरुद्ध आहे.
मी स्वत: आणि शेतकरी संघटना जकात कराच्या कायम विरोधात राहिलो आहोत. देशाच्या एका कोपऱ्यातून माल घेऊन दुसऱ्या कोपऱ्यात जायचे म्हटले, तर वाहनांना जकातीसाठी जागोजाग थांबावे लागते, करवसुलीदारांशी हुज्जत घालावी लागते, तोपर्यंत पुष्कळ वेळा गाडय़ांची इंजिने इंधन खात चालू राहतात, त्यामुळे प्रदूषणातही भर पडते, अशी अनेक कारणे जकात कराच्या विरोधात आम्ही देत होतो. यासंबंधी प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाशीही बोलणी करण्याचे अनेक प्रसंग आले. प्रत्येक वेळी शासनाचा एकच युक्तिवाद असे - 'जकात हे नगरपालिकांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे, त्याला पर्याय मिळेपर्यंत जकात कर रद्द करणे शक्य होणार नाही.' खरे पाहता जकात कर चालू ठेवण्याचे एकमेव प्रयोजन असे होते, की जकात करवसुलीत कोठेही चेकचा व्यवहार होत नसे, पसे रोखीने गोळा केले जात व ते जकात नाक्यावरील एका पेटीत ठेवले जात. नगरपित्यांना येता-जाता कोणत्याही जकात नाक्यावर थांबून त्यात हात घालून वरखर्चासाठी पसे उचलण्याची शक्यता त्यामुळे होती. जकातीला पर्यायी उत्पन्नाचे साधन मिळाले पाहिजे हा निव्वळ बहाणा होता.
पुढे व्हॅट म्हणजे 'मूल्यवíधत कर आला. त्या वेळी राज्याचे अर्थमंत्री  जयंत पाटील यांनी, 'व्हॅट अमलात आल्यास शासनाला जकात बंद करता येईल,' असे आश्वासनही खुलेआम दिले होते. प्रत्यक्षात व्हॅट आला, व्यापाऱ्यांनी तो काही प्रमाणात स्वीकारलाही, पण जकात कर काही बंद झाला नाही. आता राज्य शासनाने स्थानिक संस्थांचा आíथक प्रश्न सोडविण्यासाठी एक नवीन उत्पन्नाचे कलम काढले आहे. यासाठी 'स्थानिक संस्था कर' (छूं' इ८ि ळं७ -छइळ) बसवण्याची शासनाची योजना आहे. स्थानिक संस्था कराच्या विरोधातील या लढय़ात व्यापारी मोठय़ा अहमहमिकेने उतरत आहेत. एरवी मवाळ वाटणाऱ्या व्यापारी वर्गाला एवढा आक्रोश करण्याचे काय कारण आहे?बहुतेक किराणा दुकाने ही एकाच कुटुंबाची असतात. त्यात काम करणारे सगळे कुटुंबातीलच असल्यामुळे चोरापोरीची फारशी शक्यता राहत नाही. कोणता माल कोठे आणि किती आहे हे प्रत्येकालाच ठाऊक असते. याउलट, प्रत्येक मॉलमध्ये गिऱ्हाईकाने घेतलेल्या मालाची काऊंटरवर नोंदणी करतानाच आता विशेष प्रकारचा माल दुकानात शिल्लक किती राहिला याचा हिशेब ठेवण्याकरिता काही विशेष सॉफ्टवेअर वापरले जाते. किराणामालाच्या दुकानात कागदोपत्री लिखापढी अजिबात नसते. स्थानिक संस्था करामुळे किराणा दुकानांच्या नेमक्या याच मर्मावर घाला घातला गेला आहे. या कराची अंमलबजावणी होताच प्रत्येक दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारची रजिस्टरे व पत्रके ठेवावी लागतील. शेजारच्या एका सर्वसाधारण किराणा मालाच्या दुकानात पाचेक हजार प्रकारचा माल विक्रीसाठी ठेवला जातो. या वस्तू विकत घेण्यासाठी अनेक ग्राहकांची सारखी रीघ लागलेली असते. एका दिवशी साधारणपणे पाचेकशे ग्राहक दुकानात खरेदीसाठी येतात. दुकानदारास प्रत्येक माल कोठून खरेदी केला, त्या दुकानाचा पत्ता, छइळ रजिस्ट्रेशन क्रमांक, खरेदीचा दिनांक तसेच विक्रीची तारीखवार व वस्तुवार नोंद असलेली रजिस्टरे रोजच्या रोज हरघडी भरावी लागतील. रजिस्टरे व शिल्लक माल यांचा ताळमेळ राहील याची सतत काळजी घ्यावी लागेल. यात काहीही चूक झाली तर त्याच्याकडून दंड गोळा करणारी इन्स्पेक्टर यंत्रणा सज्जच असणार आहे. किराणा दुकानदाराला मॉलला तोंड देता आले, कारण त्या वेळी मॉलची कार्यपद्धती अमलात आणण्याची त्याच्यावर सक्ती नव्हती. स्थानिक संस्था कराने किराणा दुकानांच्या एक कुटुंब व्यवस्थेवर हल्ला करून त्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवण्यासाठी लिखापढी सक्तीची केली आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत चर्चा केली आहे. त्यात नोंदणीपात्रतेसाठीची उलाढालीची मर्यादा वाढवून व्यापाऱ्यांत मोठे व छोटे अशी फूट पाडण्याचे घाटत होते. बातम्यांनुसार ही भीती खरीही ठरली आहे. करपात्रतेसाठी उलाढालीची किमान मर्यादा आयात होणाऱ्या मालासाठी एक लाखावरून तीन लाख रुपये, तर वर्षभरातील विक्रीसाठी दीड लाखावरून चार लाख करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यात सरकारचा हेतू व्यापाऱ्यांत छोटे व मोठे व्यापारी असा भेद करून फूट पाडण्याचा आहे हे उघड आहे.'यथावकाश जकातीला पर्याय म्हणून असलेला हा स्थानिक संस्था कर, तुटक्याफुटक्या अवस्थेत का होईना, अमलात येईल. त्यामुळे नगरपालिकांच्या उत्पन्नाचे काही हुकमी साधनही उपलब्ध होईल. मुख्य प्रश्न वेगळाच आहे. या नगरपालिकांची पर्यायी उत्पन्न घेण्याची पात्रता आहे काय, असा खरा प्रश्न आहे.
कोणत्याही नगरपालिकेचा कारभार पाहिला तर -
 
पाणीपुरवठा व्यवस्था संपूर्णत: कोसळलेली आहे. पाण्याच्या वाहिन्या जागोजाग फुटल्या आहेत किंवा गळत आहेत आणि मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहून जात आहे असे दिसून येईल.
 
रस्त्याची दुरुस्ती ही क्वचितच होते. दुरुस्ती झाल्यानंतर रस्त्यांत लवकरच पुन्हा मोठे मोठे खड्डे दिसू लागतात.  या दुरुस्तीकरिता मंजूर होणारा पसा कोणाच्या खिशात जातो याबद्दल नागरिकांना मोठे कुतूहल असते.  
नगरपालिकांच्या शाळा किंवा इस्पितळे पाहिली, तर सगळा परमानंदच आहे. इस्पितळातील अस्वच्छता व शाळांतील शिक्षकांची निरक्षरता याविषयी पुष्कळ लिहिले गेले आहे.
 
जागोजागी साठलेला कचरा वाहून नेणे हे नगरपालिकेचे एक महत्त्वाचे काम आहे; किंबहुना या कचऱ्याच्या वाहतुकीची व विल्हेवाटीची व्यवस्था अक्कलहुशारीने केली, तर त्यातूनही नगरपालिकेला जकातीइतके उत्पन्न मिळू शकेल.
अलीकडेच शीळफाटय़ावर इमारत कोसळून ७४ जणांचे प्राण गेले. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामे उभी राहतात कशी, त्यांत रहिवाशांना घुसवतो कोण आणि त्यांचे राजकारण करतो कोण, हा प्रश्न झोपडपट्टीइतकाच गुंतागुंतीचा झाला आहे.
मग या नगरपलिका करतात तरी काय? या पाणी पुरवत नाहीत, रस्ते साफ ठेवत नाहीत, शाळा नीट चालवत नाहीत, दवाखाने सांभाळत नाहीत; प्रत्येक ठिकाणी या सेवांसाठी पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली आहे. मग त्याच त्याच कामांसाठी पुन्हा एकदा निवडणुका घेऊन नगरपित्यांना निवडून द्यावे, त्यांनी सभागृहात गोंधळ घालावा आणि सभागृहाच्या बाहेर, मिळतील त्या मार्गाने पसे कमवावेत या सर्वाचे प्रयोजन काय?स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात प्रथम बंगालमध्ये झाली. त्या काळी कोलकात्याचे नगराध्यक्ष म्हणून देशबंधू चित्तरंजन दास यांची निवड झाली होती. त्यांनी कोलकात्याकरिता, नगराध्यक्ष म्हणून, जी सेवा दिली त्याचे पुरावे आजही बंगाली साहित्यात जागोजाग दिसतात.
आजच्या नगरपालिका म्हणजे भावी आमदारांची राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी राजकीय आखाडय़ाचा सराव करण्यासाठीची क्रीडांगणे झाली आहेत. स्थानिक संस्था कराच्या निमित्ताने व्यापारी मंडळींचे आंदोलन उभे होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यायी उत्पन्नाचे साधन देणे आवश्यक आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न नसून काहीही काम न करणाऱ्या नगरपालिका या संस्थाच मुळी संपवून टाकण्याची वेळ आली आहे काय? हा आहे.
६ लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.